11 September 15:10

ऊस उत्पादन अल्प आणि कारखानेच अधिक- शरद पवार


ऊस उत्पादन अल्प आणि कारखानेच अधिक- शरद पवार

कृषिकिंग, पुणे: “राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली असून त्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणारी वीज राज्य सरकार खरेदी करीत नसेल तर ते चुकीचे आहे. देशाच्या पंतप्रधानांचे ते धोरण असताना राज्य सरकारने वीज खरेदी करावी,” अशी मागणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

तसेच ऊस उत्पादन अल्प आणि कारखानेच अधिक अशी गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. काही नेते आणि आमदारांकडून नवीन कारखाने उभारण्याचा धडाका अद्यापही सुरुच असून, माणसे सांभाळण्यासाठी आम्हाला मदत करावी लागते, असे पवार म्हणाले आहे. कारखाने उभारु नका असा सल्ला काहींना दिला; मात्र ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे कारखाने काढा पण पुढील समस्यांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा सल्ला मी आवर्जून देतो, असेही पवार म्हणाले आहे.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये ‘ऊस विकास कृती कार्यक्रम’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, ‘दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील १० लाख हेक्टरचे ऊस क्षेत्र कमी झाले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनुसार, ठिबक सिंचन करण्याच्या अटीवर ऊस उत्पादनाला परवानगी मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शाश्वत ऊस उत्पादन केल्यास कारखानदारी टिकू शकेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे.टॅग्स