27 August 17:55

उन्हाळ कांद्याचा चाळीत दम गुदमरतोय! दरात २०० रु. घसरण


उन्हाळ कांद्याचा चाळीत दम गुदमरतोय! दरात २०० रु. घसरण

कृषिकिंग, लासलगाव/पुणे: चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता चाळीत गुदमरून सडू लागला आहे. तर भावात ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यातच मागील आठवड्यात अचानक २०० रुपयांनी भाव कमी झाल्याने पुढे काय? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा कि नाही, भाव वाढतील का, आता विक्री केला अन उद्या भाव वाढले तर..असे प्रश्न शेतकऱ्यांची द्विधावस्था करत असतात. आणि शेवटी शेतकऱ्याला फटका बसतो.

काही शेतकऱ्यांनी काढणी नंतर लागलीच मार्च ते मे मध्ये उन्हाळ कांदा सरासरी ६५०-७०० रुपयांनी विक्री केला होता. त्यावेळी कांदयाची प्रतही उत्तम होती तर वजनही भरघोस होते. मात्र मागील वर्षाप्रमाणे जुलै नंतर तेजी आली तर भाव दोन हजारांपर्यत जातील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तेव्हा विक्री न करता कांदा चाळीत साठवला होता. राज्यातील एकूण उत्पादित उन्हाळ कांद्यापैकी ४० ते ५० टक्के कांदा सध्या चाळीत आहे. तीन-चार महिने चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळावे ही रास्त अपेक्षा असते. मात्र मागील अनेक दिवसापासून ६०० ते ९५० रुपये प्रतिक्विंटल दरानेच विक्री होत आहे.

चीन,कर्नाटकमधील कांद्याच्या अडचणी आणि राज्यातील खरीप पोळ कांद्याची लागवड लांबल्याने उन्हाळ कांदा येत्या काळात भाव खाणार असे जाणकारांकडून सांगितले जात होते. मात्र, चिंता मात्र वाढतच आहे. कर्नाटक,आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली तर फलटण व लोणंद भागातील लाल कांदा १५ सप्टेंबरनंतर येईल. तर आपल्याकडे लाल कांद्याची विक्रमी लागवड होत असल्याने ऑक्टोबपर्यंत विक्रीला येणार आहे. त्यातच चाळीतला कांदा डागू लागल्याने आता चाळीत साठविलेला कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही. बाजार समित्यांमध्ये ऊन्हाळ कांद्याची आवक अजून टिकून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात १०० ते २०० रुपये घसरण झाली.टॅग्स