17 August 09:47

उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता- आयएमडी


उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: आतापर्यंत पावसाने ओढ दिलेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तर पश्‍चिम विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातील काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे या भागात गेल्या अडीच महिन्यातील पावसाची सरासरीही गाठली गेली नाही. या पार्श्‍वभूमीवर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (१७ ऑगस्ट) पश्‍चिम विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.



टॅग्स