26 July 17:33

उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी


उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासांत राजधानी दिल्लीसह उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड या उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय मध्यप्रदेशचा उत्तर भाग, पश्चिमी उत्तरप्रदेश, पूर्व राजस्थान, आणि हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, चालू खरीप हंगामात १ जून ते २५ जुलै याकाळात देशभरात सरासरीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे.

तसेच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, जम्मू-काश्मीरसह तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. असा अंदाजही आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आयएमडीने दोन दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे या राज्यांमधील धान पिकाच्या लागवडीसह अन्य खरीप पिकांच्या लागवडीला वेग येणार आहे. तर तिकडे राजधानी दिल्लीमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून, अनेक रस्त्यांवर-हायवेंवर गुडघाभर पर्यंत पाणी भरले आहे. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.