07 December 12:23

उठावच नाही तर भाव कसा मिळणार? वाशी मार्केटमध्ये ५०० टन कांदा पडून


उठावच नाही तर भाव कसा मिळणार? वाशी मार्केटमध्ये ५०० टन कांदा पडून

कृषिकिंग, मुंबई: नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (वाशी) मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने भावात घसरण सुरू आहे. ५०० टनांपेक्षा जास्त माल विक्री न झाल्यामुळे पडून आहे. चार दिवसांमध्ये जवळपास पाच टन माल सडला असून, मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

बाजारभाव घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने उन्हाळ कांद्याचे भाव पडले आहेत. मुंबईमध्ये काल (गुरुवारी) ७० ट्रक व ५१ टेम्पो मिळून १२१ वाहनांमधून १३४४ टन मालाची आवक झाली आहे. तर बुधवारी १७४६ टन आवक झाली होती.

मागणीपेक्षा आवक जास्त झाली असून माल ठेवायचा कुठे? असा पेच व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सर्व गोडाऊन भरली आहेत. मोकळ्या पॅसेजमध्येही शेकडो गोणींची थप्पी लावण्यात आली आहेत. लिलावगृहामध्येही पाय ठेवण्यास जागा नाही. होलसेल मार्केटमध्ये ६ ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवली असल्यामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.टॅग्स