07 January 10:44

आर्थिक संकटाने ऊस उत्पादकांची आत्महत्या; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवारांचं मोदींना पत्र


आर्थिक संकटाने ऊस उत्पादकांची आत्महत्या; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवारांचं मोदींना पत्र

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामुळे आत्महत्या करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे बंड टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलणे आवश्यक असल्याचे पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले. लहान ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची निराशा आहे. त्यामुळे त्यांना मदत देण्यासाठी आवश्यक पाऊल उचलणे आवश्यक असल्याची सूचनाही पवारांनी केली आहे.

पिकाला मिळणाऱ्या भावावरून देशभरातील शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. हिंदी पट्ट्यात तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर कृषी संकटाच्या मुद्द्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा मांडण्यासाठी मला पुन्हा एकदा पत्र लिहिणे भाग पडत आहे, असे सांगत पवार यांनी नमूद केले की, साखर कारखाने ऊस उत्पादकांची देयके अदा करण्यात असमर्थ आहेत. यामुळे लहान ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेची भावना आहे. या एकूण वातावरणात ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत.