24 July 12:53

आयएमडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती


आयएमडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) चालू खरीप हंगामात मॉन्सूनचे पर्जन्यमान हे सर्वसाधारण असणार असून, देशातील सर्व राज्यांमध्ये निर्धारित वेळेत मॉन्सूनचा पाऊस पडेल, अशी भविष्यवाणी केली होती. मॉन्सूनचा पाऊस आयएमडीने वर्तवलेल्या निर्धारित वेळेत दाखल झाला. मात्र, मॉंन्सून दाखल होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला गेल्यानंतर बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांसोबतच अन्य राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एकप्रकारे आयएमडीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खरीप पिकांची लागवड ही मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असते.जून-जुलै महिन्यात खरिपाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली असते. मात्र, या दोन महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण राहिले, तर त्याचा थेट परिणाम हा खरिपाच्या एकूण लागवडीवर होत असतो. याशिवाय खरिपाच्या प्रति हेक्टरी उत्पादनातही घट नोंदवली जाते. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षीची खरिपाची लागवड ९.३१ टक्क्यांनी घट असून, ६३१.५३ लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ६९६.३५ लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती.

दरम्यान, आयएमडीने चालू खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडेल. क्षेत्रीय दृष्ट्या विचार करता, पश्चिमोत्तर भारतात सामान्यच्या तुलनेत १०० टक्के, मध्य भारतात सामान्यच्या तुलनेत ९९ टक्के, दक्षिण भारतात ९५ टक्के, तर पूर्वोत्तर भारतात ९३ टक्के पाऊस पडेल. असा अंदाज वर्तविला होता. मात्र, आता देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने आयएमडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.