16 April 16:41

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला शरद पवार देणार..आपल्या संस्थेत नोकरी


आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला शरद पवार देणार..आपल्या संस्थेत नोकरी

कृषिकिंग, उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं आर्थिक फसवणूक झाल्यानं दोनच दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ढवळे यांनी शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे नाव लिहिले होते. या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तडवळा येथे काल (सोमवारी) संध्याकाळी घरी जाऊन भेट घेतली. उस्मानाबाद येथील प्रचारसभेचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलत पवार यांनी प्रथम ढवळे कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी पवार यांनी दिलीप ढवळे यांच्या मुलाला आपल्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मुलाचे शिक्षण झाल्यानंतर माझ्याकडे घेऊन या, असे पवारांनी ढवळे कुटुंबीयांना सांगितले आहे. निखिल दिलीप ढवळे सध्या उस्मानाबादमध्ये बीसीएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. दिलीप ढवळे यांना दोन मुले आहे. त्यामधील मोठा मुलगा शेती करतो. तर लहान मुलाचे शिक्षण सुरू आहे.

राज्य सरकारने ढवळे कुटुंबीयांना तात्काळ मदत जाहीर करावी तसेच त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल होत नसल्याने शरद पवार यांनी नाराजीही व्यक्त केली. गुन्हा नोंद न झाल्यास तो कसा नोंद करवून घ्यावयाचा हे देखील आपल्याला चांगले कळते, असा इशाराही पवारांनी यावेळी दिला आहे.