14 February 10:25

आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे गारपिटीबाबतचे अंदाज चुकले- तज्ञ


आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे गारपिटीबाबतचे अंदाज चुकले- तज्ञ

कृषिकिंग, पुणे: गेल्या दोन-तीन दिवसांत विदर्भ-मराठवाड्यात झालेल्या गारपिटीचे हवामान खात्याचे अंदाज खरे ठरले असले तरी याबाबत युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टिंग, जपान मेटलर्जी एजन्सी, ग्लोबल फोरकास्ट सिस्टिम (अमेरिका), नोव्हा एन्व्हायर्नमेंटल मॉडेलिंग सिस्टिम या आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांचे अंदाज मात्र चुकल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘११ फेब्रुवारीच्या गारपिटीसंदर्भातले सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज चुकले. या अंदाजांमध्ये वर्तवल्यापेक्षा जास्त पाऊस त्यांनी न सांगितलेल्या भागात झाला. आंतरराष्ट्रीय मॉडेल्सवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे तथ्य आहे. ‘इंटरनॅशनल थोरपेक्स प्रोग्रॅम’अंतर्गत येणाऱ्या पाच मॉडेल्सच्या आधारे जगातील तीव्र हवामान बदलांचा अंदाज दिला जातो. यातल्या एकाही मॉडेलला ११ फेब्रुवारीच्या गारपिटीचा अचूक अंदाज देता आला नाही. तसेच या मॉडेल्सनी कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि राजस्थानात अतिवृष्टीचा इशारा दिला, जो पूर्ण चुकीचा ठरला’, असे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) साडेचारशे कोटींचा सुपर कॉम्प्युटर गेल्याच महिन्यात आणला गेला. देशातली ही पहिलीच मल्टी पेटाफ्लॉप्स सुपर कॉम्प्युटर एचपीसी प्रणाली आहे. या सुपर कॉम्प्युटरचे नामकरण ‘प्रत्युष’ करण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त जगात फक्त जपान, इंग्लंड, अमेरिका या तीनच देशांकडे या क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आहे. याद्वारे ‘उष्णतेची लाट, गारपीट, वीज पडणे, अतिवृष्टी, सुनामी या तीव्र हवामान प्रक्रियांचे अचूक अंदाज देणाऱ्या मॉडेल्सल्या संशोधनासाठी सुपर कॉम्प्युटरचा उपयोग सुरू झाला आहे.