20 March 18:41

अमरावती विभागात साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा


अमरावती विभागात साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा

कृषिकिंग, अमरावती: कर्जमाफी जाहीर केलेल्या तारखेपासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या थकीत रकमेवर व्याजाची आकारणी करू नये, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी बँका व बँक प्रतिनिधींची बैठकीत दिले होते. मात्र, व्यापारी बँका व जिल्हा बँकामध्ये एकवाक्यता नसल्याने सहकार विभागाने १३ मार्चला परिपत्रक काढून जिल्हा बँकाना तंबी दिली आहे. त्यामुळे आता अमरावती विभागातील जिल्हा बँकांतील आतापर्यंत १५२६ कोटींची कर्जमाफी झालेल्या ३ लाख ५३ हजार ८५४ खातेदारांचा सातबारा कोरा होणार आहे व प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या किमान ४५ कोटींच्या व्याज आकारणीपासून शेतकरी बचावणार आहे.

२२ फेब्रुवारी २०१८ ला ‘एसएलबीसी’द्वारा व्यापारी बँकांच्या बैठकीत याच सूचनांचा पुरूच्चार करण्यात आला. मात्र, काही बँकांनी या निर्देशांचा अवलंब केला, तर काही जिल्हा बँकांनी व्याजाची आकारणी सुरूच ठेवल्याने कर्जमाफीच्या मूळ उद्देशालाच तडा गेला. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ (अ) नुसार या योजनेच्या लाभार्थींना कर्जमाफीचा लाभ मिळेतोवर थकीत रकमेवर कर्जाची आकारणी करू नये, असे आदेश सहकार विभागाने बजावले. त्यामुळे आता शेतकऱ्यांची व्याज आकारणीतून सुटका होणार आहे.