24 December 11:05

अपंगत्वावर मात करून साधली कृषी प्रगती


अपंगत्वावर मात करून साधली कृषी प्रगती

कृषिकिंग, रेवाडी(हरियाणा): २००२ मध्ये अर्थात १५ वर्षांपूर्वी शेतात काम करताना धान्य काढणी यंत्रांत (थ्रेशर) अडकल्याने हरियाणातील रेवाडी येथील शेतकरी भूपेंद्र सिंह यांचा हात कापला गेला. त्यामुळे काही काळासाठी त्यांचे जीवन पूर्णपणे थांबले होते. त्यांना शेतातील कामे करणे अवघड झाले होते. मात्र, काही दिवसात या अपघातातून सावरत स्वतःला त्यांनी मानसिकरित्या खंबीर केले आणि पुन्हा शेती करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या या अपंगत्वाला त्यांनी कधीही आपल्या शेती प्रगतीत आडवे येऊ दिले नाही.

एका हाताने काम होत नसतानाही त्यांनी आपल्या शेतीत नव-नवीन प्रयोग करत एक प्रगतीशील शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आज स्थितीत भूपेंद्र सिंह यांना राष्ट्रीय स्तरावरील अनेक कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ते पारंपारिक शेतीसोबतच मस्त्यपालन, वर्मी कंपोष्ट खतनिर्मिती, मशरूम शेती, भाजीपाला आणि एलोवेराची शेती करून लाखो रुपये कमावत आहेत.

हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील भाडावास गावातील ५९ वर्षीय शेतकरी भूपेंद्र सिंह शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहे. आपल्या शेतीतून वर्षाला १० ते १२ लाख रुपयांची कमाई ते करतात. भूपेंद्र २० वर्षांचे असल्यापासून शेती करतात. पारंपारिक शेतीतून विशेष उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी तंत्रज्ञान्याचा वापर करून शेती करायला सुरुवात केली. भूपेंद्र यांनी कृषी तज्ञांकडून सल्ला घेत आपल्या दोन एकरवर शेततळे निर्माण करत मस्त्यपालन सुरु केले. या मस्त्यपालनातून वर्षाला त्यांना दीड ते पावणे दोन लाख रुपयांची अतिरिक्त कमाई होत आहे. तसेच त्यांनी आपल्या शेतात युरियाचा वापर कमी करण्यासाठी वर्मी कंपोष्ट खतनिर्मिती सुरु केली, त्यासोबतच त्यांनी गोबरगॅसचीही उभारणी केली. वर्मी कंपोष्ट, गोबरगॅस निर्मिती सोबतच त्यांना आपल्या तळ्यातून ५ वर्षातून एकदा मोठ्या प्रमाणात खत मिळते. त्यामुळे त्यांच्या शेतातील युरियाचा वापर कमी झाला असून, ते चांगल्या उत्पन्नासह अधिक कमाई घेत आहे. आपल्या काही शेतामध्ये ते भाजीपाला पिकेही घेतात. त्यांनी एलोवेराचीही लागवड केली आहे.

भूपेंद्र यांना मिळालेले पुरस्कार
त्यांच्या शेतीतील कर्तृत्वासाठी त्यांना अनेक कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. १९९१-९२ मध्ये पहिल्यांदा गहू आणि मोहरीसाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. २००३ मध्ये हात कापला गेल्यानंतर शेतीतील नव-नवीन प्रयोगांसाठी त्यांना राज्यस्तरीय देविलाल पुरस्काराने गौरवण्यात आले. २००६-०७ मध्ये त्यांना शेतीतील नियोजनासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१५ मध्ये मस्त्यपालनासाठी त्यांनी रेवाडी जिल्ह्यासाठीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय इफ्फ्को सहित कृषी क्षेत्रातील अनेक महत्वाच्या संस्थांकडून त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी असे एकूण ५० पेक्षा जास्त सन्मानपत्र मिळाले आहेत.

भूपेंद्र यांचा उत्साह
आज ५९ व्या वर्षातही त्यांना नवीन शिकण्याची तीव्र इच्छा आहे. शेती संबंधित तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी दूरवरच्या जिल्ह्याच्या प्रवास करतात. २०१५ मध्ये करनाल येथे झालेल्या मशरूमच्या शेतीबाबत त्यांनी प्रशिक्षण घेऊन त्यांची शेती करत आहेत. आता त्यांनी मस्त्यपालनासाठी उभारलेल्या तळ्याच्या वरती पोल्ट्री तयार करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या दोन महिन्यात त्यांचा हा पोल्ट्री कार्यरत होईल. असे त्यांनी म्हटले आहे.