19 December 15:50

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी हंगाम वाया


अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी हंगाम वाया

कृषिकिंग, पुणे: “ऑक्टोबरच्या शेवटी झालेल्या अवकाळी पाऊस आणि ओखी वादळामुळे महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील ९० टक्के फळ सडत आहेत. मागील वर्षी स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. परंतु यावर्षीच्या हंगामात गेल्या महिन्यातील अस्थिर हवामान आणि अवेळी आलेल्या पावसामुळे बहुतेक मालाचे नुकसान झाले आहे.” अशी माहिती स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसजीएआय) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एकूण उत्पादनापैकी ९० टक्के स्ट्रॉबेरी शेतातच फेकून द्यावी लागत आहे. कारण शेतात साठवलेले स्ट्रॉबेरीचे पिक बुरशीजन्य संक्रमणास बळी पडत आहेत. तर उर्वरित फक्त १० ते १५ टक्के उत्पादन हे विक्रीयोग्य ठरत आहे.” अशी माहिती स्ट्रॉबेरी ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसजीएआय) अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांनी दिली आहे.

फळ कुजनीमुळे स्ट्रॉबेरीचे दरही कमी असून, ६० ते ७० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. चालू हंगामात महाबळेश्र्वर आणि आसपासच्या प्रदेशातील २ हजार एकरांच्या स्ट्रॉबेरी लागवडीतून दररोज जवळपास १० टन इतके उत्पादन घेतले जात आहे.

महाराष्ट्रात विशेषतः महाबळेश्वरच्या जवळपासच्या परिसरात २५०० एकरवर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी स्ट्रॉबेरी उत्पादकांनी महाबळेश्वर परिसरात ३ हजार एकरांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली गेली आहे.