17 February 11:00

अतिरिक्त कृषी उत्पादन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय


अतिरिक्त कृषी उत्पादन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतंय

कृषिकिंग रिसर्च टीम: कृषी उत्पादनात जगभरात अग्रेसर असलेला भारत कृषी निर्यातीत मात्र पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. सध्यस्थितीत कृषी उत्पादनात पहिल्या ५ देशांमध्ये असलेला भारत निर्यातीत मात्र, पहिल्या १० देशांमध्ये सुद्धा नाही. ही मोठी चिंतेची बाब आहे.

देशात विक्रमी कृषी उत्पादन नोंदवले जात आहे. अनेक पिकांचे उत्पादन हे देशातील एकूण मागणीपेक्षा कित्येक पटीने अधिक होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऊसाचे विक्रमी होत असून, परिणामस्वरूप मागील वर्षी देशात ३१५ लाख टन इतके विक्रमी साखरेचे उत्पादन नोंदवले गेले. याउलट देशातील साखरेची मागणी ही केवळ २५० लाख टन इतकी आहे. तसेच मागील वर्षीचाही काही अतिरिक्त साठा शिल्लक होता. देशात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या आधीच दरात मोठी घसरण असल्याने भारतीय साखरेची निर्यात होऊ शकली नाही.

सरकारकडून ५० लाख टन साखरेच्या निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. मात्र, त्यापैकी किती साखर निर्यात झाली याबाबत साशंकता आहे. त्यामुळे देशातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले. कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात असफल ठरले असून, थकबाकी वाढतच चालली आहे. २०१८ च्या डिसेंबरअखेरपर्यंत देशभरातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची जवळपास १९ हजार कोटींची थकबाकी शिल्लक आहे.

डाळ व अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांचीही हीच परिस्थिती आहे. देशात यावर्षी डाळींचे विक्रमी २१० लाख टन उत्पादन नोंदवले गेले. देशात डाळींचे आधीच अतिरिक्त उत्पादन झाले असताना सरकारकडून यावर्षी ५०.८ टन डाळींची आयात करण्यात आली. यासाठी सरकारकडून आयातीवर निर्बंध घालण्यात आले खरे..मात्र मूग, उडीद, हरभरा यांसह सर्व डाळवर्गीय किमान हमीभावही मिळाला नाही. शेतकऱ्यांना मजबुरीने हमीभावापेक्षा जवळपास १००० ते १५०० रुपये कमी दराने डाळ वर्गीय पिकांची विक्री करावी लागली.

कांदा, टोमॅटो, बटाटा आणि अन्य भाजीपाला पिकांची गत यापेक्षा वेगळी नाही. कांद्याला कवडीमोल ५० पैसे प्रति किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनिऑर्डर केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांदा चाळीतच आपली जीवनयात्रा संपवली. बटाटा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा यापेक्षा वेगळ्या नाही.

मागील वर्षीच्या कृषी निर्यात आकडेवारीवर नजर टाकली असता, वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ३० क्षेत्रांपैकी १६ मध्ये निर्यातीत घट झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या अनेक कृषी उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे देशात विक्रमी उत्पादन तर होतंय. मात्र, त्यातुलनेत कृषी निर्यातीत वाढ होत नसल्याने अतिरिक्त उत्पादन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणंही मुश्किल होऊन बसलं आहे.