साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील ६८ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस
08 May 11:03

साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील ६८ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस


साखर आयुक्तांचा दणका; राज्यातील ६८ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस

कृषिकिंग, पुणे: उसाला रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील ६८ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावलीये. या कारखान्यांच्या ‘एफआरपी’च्या थकीत रकमेवर १५ टक्के व्याज आकारण्यात येणार असून, उत्पादित साखर, मळी यांची विक्री करून त्यातून ‘एफआरपी’ वसूल केली जाणार आहे. गरज भासल्यास या कारखान्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

या ६८ कारखान्यांकडे एकूण १ हजार ३२०.६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ‘या कारखान्यांना यापूर्वीही ‘एफआरपी’ देण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी तो न दिल्यामुळे पुन्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत’, असेही साखर आयुक्त गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

सद्यस्थितीत राज्यात एकूण ३ हजार ५९५ कोटी रुपये इतकी थकीत एफआरपी आहे. ही थकबाकी शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार करण्यात आली. त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी २ मे रोजी थकीत एफआरपीवरून साखर आयुक्तांना, तर दुष्काळावरून विभागीय आयुक्तांना भेटून यासंदर्भांत जाब विचारणार असल्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे राजू शेट्टी यांनी सोमवारी साखर आयुक्तांची भेट घेतली होती. शेट्टी यांच्या भेटीनंतर साखर आयुक्तांकडून आता हे जप्तीचे आदेश देण्यात आले आहे.संबंधित बातम्या