कर्ज घेऊनही शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांना जाणार नोटिस- साखर आयुक्त
02 May 14:55

कर्ज घेऊनही शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांना जाणार नोटिस- साखर आयुक्त


कर्ज घेऊनही शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांना जाणार नोटिस- साखर आयुक्त

कृषिकिंग, पुणे: केंद्र सरकारच्या अल्प मुदतीच्या कर्ज योजनेचा लाभ घेऊनही शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून नोटिस पाठवली जाण्याची शक्यता आहे. संबधित साखर कारखान्याची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात रेव्हेन्यू रिकव्हरी नोटिस पाठवण्यात येणार आहे.

याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, "काही साखर कारखान्यांनी त्यांच्या खात्यावर अल्प मुदतीच्या कर्ज योजनेतील रक्कम जमा झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. अशा साखर कारखान्यांना लवकरच नोटिस पाठवण्यात येणार आहे. या कारखान्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबाद व सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्याचा समावेश आहे."

राज्यातील १५ एप्रिलपर्यंतच्या एफआरपी अहवालानुसार राज्यात अजूनही ४ हजार ३२४ कोटी रुपयांची एफआरपी शिल्लक आहे. यावर्षीच्या गाळप हंगामात एकूण देय एफआरपी २१ हजार ९३४ कोटी रुपये होती. आतापर्यंत साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १७ हजार ९२८ कोटी रुपये दिले आहेत. टक्केवारीचा विचार केला तर, आतापर्यंत ८२ टक्के एफआरपी देण्यात आली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार १९५ पैकी १६१ साखर कारखान्यांनी एफआरपीचे पैसे दिले आहेत. त्यातील ३४ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर, ७७ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के तर ४९ साखर कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली. तर राज्यातील ३५ साखर कारखान्यांनी ६० टक्क्यांहून कमी एफआरपी दिली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या