शेतकऱ्याचा दिलदारपणा; उसाचं पाणी थांबवून गावाला पाणी पुरवतोय हा शेतकरी
29 April 12:43

शेतकऱ्याचा दिलदारपणा; उसाचं पाणी थांबवून गावाला पाणी पुरवतोय हा शेतकरी


शेतकऱ्याचा दिलदारपणा; उसाचं पाणी थांबवून गावाला पाणी पुरवतोय हा शेतकरी

कृषिकिंग, हिंगोली: मराठवाड्यासह राज्यभरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील असोंदा गावात एका शेतकऱ्याचा दिलदारपणा समोर आला आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातून पाइपलाइनद्वारे गावात पाणी आणले आहे. दिवसभर हातात पाइप धरून पाण्यासाठी येणाऱ्यांची भांडी हा शेतकरी भरून देताे. यासाठी त्यांनी आपल्या दीड एकर शेतातील उसाला पाणी देणे पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सीताराम रामचंद्र घुगे (रा. असोंदा) असे या दिलदार शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे ४ एकर शेती आहे. यातील दीड एकरात त्यांनी ऊस लावला आहे. मात्र, यावर्षी राज्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशीच परिस्थिती असोंदा येथील ग्रामस्थांची असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी घुगे यांनी आपल्या शेतातील उसासह इतर पिकाला पाणी देणे थांबवून ग्रामस्थांसाठी मोफत पाणी खुले केले. घुगे यांनी ऐन पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांसाठी गावात पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांची भटकंती थांबण्यास मदत झाली. त्यामुळे या शेतकऱ्याचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.

"पिकांपेक्षा माणुसकी खूप महत्वाची आहे. गावाला मोफत पाणी देण्यातच खूप समाधान वाटत आहे. तसेच चारा टंचाई असल्याने त्याच दीड एकर उसात गुरेही चरण्यासाठी सोडली आहेत." अशी भावना शेतकरी घुगे यांनी व्यक्त केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या