'गंगाखेड शुगर' प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
24 April 09:58

'गंगाखेड शुगर' प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश


'गंगाखेड शुगर' प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

कृषिकिंग, औरंगाबाद: संचालक रत्नाकर गुट्टे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आल्यानंतर, आता या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. परभणी जिल्ह्यातील 'गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी'लि. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याच्या प्रकरणाविरोधात गिरीधर साळुंके आणि इतर शेतकऱ्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि. या कारखान्याने १६ ते १७ हजार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज उचलून त्याचा अपहार केला. त्यामुळे संचालकांसह इतर दोषींविरोधात कारवाईची विनंती करण्यात आली. याचिकेत खंडपीठाने प्रकरणात सखोल चौकशीसाठी ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना २३ जून २०१७ रोजी दिले होते. प्रकरणात तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी चौकशी करून, गंगाखेड शुगरने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावर खंडपीठाने संबंधित आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान २६ मार्च २०१९ रोजी गंगाखेड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणातील आंध्रा बँक, इको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिडींकेट बँक, रत्नाकर बँक या सात बँकांपैकी दोन बँकांचीच प्रकरणात चौकशी झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. शेतकऱ्यांना डीआरटीने मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. सोळा हजार शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतलेले असतानाही फक्त २२ शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी. आरोपींची मालमत्ता जप्त करावी, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात करण्यात आला.



टॅग्स

संबंधित बातम्या