मुक्या जनावरांचा जगवायचं तरी कसं?; चारा छावण्यांचा पत्ताच नाही!
23 April 10:14

मुक्या जनावरांचा जगवायचं तरी कसं?; चारा छावण्यांचा पत्ताच नाही!


मुक्या जनावरांचा जगवायचं तरी कसं?; चारा छावण्यांचा पत्ताच नाही!

कृषिकिंग, सोलापूर: एकीकडे सधन साखरपट्टा म्हणून गाळपात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकाने समोर येतो. तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला दुष्काळी भाग अशी विसंगत ओळख सोलापूरची पाहायला मिळतीये. सोलापूर जिल्ह्य़ात यावर्षी दुष्काळाचे संकट १९७२ च्या दुष्काळापेक्षाही तीव्र आहे. तीव्र पाणी टंचाईशी झुंजणाऱ्या जिल्ह्याच्या खेडय़ापाडय़ांतील ग्रामस्थांपुढे मुक्या जनावरांना जगवायचं तरी कसं? असा प्रश्न आहे.

सांगोला, मंगळवेढा भागांतील उजाड रानात तहानलेली मुकी जनावरे आकाशाकडे पाहून हंबरडा फोडतात, तेव्हा त्यांचा आकांत शेतकऱ्यांचे काळीज चिरून जातो. एप्रिल सरत आला तरी चारा छावण्यांचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी दिलाशाची आशाच सोडून दिल्याचे चित्र दुष्काळी पट्टय़ात आढळते. सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस आदी भागांत दुष्काळाची तीव्रता मन अस्वस्थ करते. परिणामी, या तालुक्यांमधील नागरिकांनी पुणे, पिंपरी-चिंचवड भागांत यापूर्वीच स्थलांतर केले आहे. तर, जनावरांना सांभाळण्यासाठी मागे राहिलेल्या ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

करमाळ्यात सुमारे सव्वा लाख मोठी जनावरे आहेत. त्यांच्यासाठी १४ चारा छावण्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असले तरी अजून एकाही चारा छावणीचा पत्ता नाही. एका जनावरासाठी दररोज किमान ५० लिटर पाणी लागते. टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरेसे नसल्याने काही शेतकरी खासगी टँकर मागवून पाणी विकत घेतात. सांगोला, मंगळवेढा, माढा, दक्षिण सोलापूर भागांत खासगी पाणी टँकरच्या धंद्याला बरकत आली आहे. प्रशासन १७८ गावे आणि १२०० वाडय़ांना १९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करते. हा केवळ दिलासा आहे, त्याने तहान भागत नाही, असे ग्रामस्थ सांगतात.टॅग्स

संबंधित बातम्या