'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात'; कमलनाथांनी सुनावलं
17 April 17:15

'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात'; कमलनाथांनी सुनावलं


'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात'; कमलनाथांनी सुनावलं

कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी मध्यप्रदेश, राजस्थान, आणि गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जीव गमावणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला होता. तसेच त्यांनी यावेळी गुजरातमधील ११ मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.

मात्र, मोदींच्या या ट्वीटनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींवर नुकसान भरपाईवरून भेदभाव करण्याचा आरोप केला. तसेच नुकसान भरपाई ही केवळ गुजरातसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित केला. 'मोदीजी, तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तुमची भावनिकता ही केवळ गुजरातपुरतीच मर्यादीत आहे का? तुमच्या पक्षाचे सरकार असले तरी मध्य प्रदेशमध्येही लोक राहतात' असं ट्वीट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं होत.

कमलनाथ यांनी हे ट्वीट केल्यानंतर पीएमओकडून त्याला तासाभरात उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे की, "यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अन्य राज्यातील मुसळधार पावसात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. गेल्या ४-५ दिवसांपासून देशभरातील हवामानात अचानक मोठा बदल झाला असून, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून देशभरात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी २८ जण हे या तीन राज्यांमधील आहे.

दरम्यान, आज सकाळीच कृषिकिंगने "मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा; ३५ जणांचा मृत्यू" या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2XkMJE7संबंधित बातम्या