दुष्काळी मराठवाड्यात साखरधंदा तेजीत; धरणांमध्ये केवळ अर्धा टक्के पाणीसाठा
17 April 10:30

दुष्काळी मराठवाड्यात साखरधंदा तेजीत; धरणांमध्ये केवळ अर्धा टक्के पाणीसाठा


दुष्काळी मराठवाड्यात साखरधंदा तेजीत; धरणांमध्ये केवळ अर्धा टक्के पाणीसाठा

कृषिकिंग, औरंगाबाद: सध्यस्थितीत दुष्काळी मराठवाडय़ात २३०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र, याच कालावधीत धरणातील बहुतांश पाणीसाठा उसासाठी वापरत मराठवाडय़ातील ४७ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १६६ लाख १७ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. त्यातून ७७९.८१ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. मात्र, आता मराठवाडय़ातील मोठय़ा धरणांमध्ये केवळ अर्धा टक्के पाणीसाठा उरला आहे.

एका बाजूला जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा नाही म्हणून ६२५ चारा छावण्या ज्या मराठवाडय़ात सुरू करण्यात आहेत. तेथे ऊस आणि साखरेची ही आकडेवारी आश्चर्यकारक मानली जात आहे. केवळ मराठवाडा नाहीच तर दुष्काळात होरपळणाऱ्या सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्य़ांतही साखरेचे उत्पादन मुबलक झाले आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील ३१ साखर कारखान्यांमध्ये १६० लाख १४ हजार ७९५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून १६३ लाख ९६ हजार १४३ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.

मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. मराठवाडय़ात गेल्या पावसाळ्यात केवळ ४१ दिवस पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीसारख्या मोठय़ा धरणांमध्ये पाण्याची तूट निर्माण झाली. ९ टीएमसी पाणी नगर आणि नाशिकमधून सोडण्याचे आदेश झाले. खळखळ करून का असेना या जिल्ह्य़ांमकडून ४.२० अब्जघनफूट पाणी मिळाले. त्यामुळे एका बाजूला दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला साखरधंदा मात्र तेजीत होता, असे चित्र दिसून येत आहे.संबंधित बातम्या