हमीभाव मिळण्यासाठी तेलंगणातील १७९ शेतकरी लढताहेत लोकसभा निवडणूक
04 April 16:56

हमीभाव मिळण्यासाठी तेलंगणातील १७९ शेतकरी लढताहेत लोकसभा निवडणूक


हमीभाव मिळण्यासाठी तेलंगणातील १७९ शेतकरी लढताहेत लोकसभा निवडणूक

कृषिकिंग, निजामाबाद: तेलंगणातील निजामाबाद लोकसभेच्या जागेसाठी एकूण १८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये हळद आणि ज्वारीला हमीभाव मिळण्यासह, हळद पिकांसाठी हळद मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी १७९ शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे.

११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात निजामाबाद मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी २८ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे आता ६०० पैकी १७९ हे शेतकरी निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता पुन्हा निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेसकडून मधुयाक्षी गौड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

तेलंगणातील अर्मूर गावचे हळद व ज्वारी उत्पादक शेतकरी कोट्टमपल्ली श्रीनिवास यांनी सांगितले आहे की, 'तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सरकारने विधानसभा निवडणूक होण्याआधी २३०० रुपये प्रति क्विंटलने ज्वारीची खरेदी सुरु केली होती. मात्र, सत्तेत येताच त्यांनी ही खरेदी बंद केली.'

शेतकऱ्यांच्या दुर्दशेची जाणीव करून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे सर्व शेतकरी अपक्ष म्हणून निवणूक लढवत आहे. ज्वारी आणि हळदीला हमीभाव निर्धारित करून, त्यांची एमएसपीने खरेदी करावी. अशी या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. (केंद्र सरकार २३ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवत असते. या २३ पिकांमध्ये ज्वारीचा समावेश नाही.)

तेलंगणामधील बाजार समित्यांमध्ये सध्या नवीन उत्पादित हळद दाखल होत आहे. या हळदीला ६ हजार २०० ते ६ हजार ३०० तर ज्वारीला १ हजार ६५० ते १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यामध्ये निजामाबाद येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन करत, हळद आणि ज्वारीला हमीभाव देण्याची मागणी केली होती. या शेतकऱ्यांनी ज्वारीला ३ हजार ५०० रुपये आणि हळदीला १५ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी कृषिकिंगने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. http://bit.ly/2DBAMSh



संबंधित बातम्या