दुर्दैवी घटना; बैलगाडीतील पाण्याच्या टाक्या कोसळून दोन भावंडांचा मृत्यू
02 April 12:06

दुर्दैवी घटना; बैलगाडीतील पाण्याच्या टाक्या कोसळून दोन भावंडांचा मृत्यू


दुर्दैवी घटना; बैलगाडीतील पाण्याच्या टाक्या कोसळून दोन भावंडांचा मृत्यू

कृषिकिंग, बीड: बैलगाडीतील पाण्याच्या दोन टाक्या अंगावर कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे काल (सोमवार) सायंकाळी सात वाजता घडली. वडवणी गावात पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत असून, दोन्ही बालके पाणीटंचाईचे बळी ठरले आहेत.

या घटनेमुळे चिंचाळा गावावर शोककळा पसरली आहे. जयदेव बळीराम राठोड (८ वर्ष ) व आविष्कार बळीराम राठोड (४ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे या मुलांच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.

चिंचाळा येथील शेतकरी बळीराम हरिभाऊ राठोड हे ऊसतोड कामगार असून, सोमवारी शेतात बैलगाडीत पाण्याच्या दोन टाक्या भरून गावात घेऊन आले होते. घरासमोर बैलगाडी उभी केल्यानंतर घरातील त्यांची दोन मुले पाठीमागून बैलगाडीला लोंबकळली. त्यामुुळे अचानक वजन वाढून बैलगाडीच्या दांड्या वर उचलल्या जाऊन बैलगाडीतील दोन्ही पाण्याच्या टाक्या घसरून, त्या थेट दोन्ही भावांच्या अंगावर कोसळल्या.

या घटनेत पाण्याच्या टाक्यांखाली दबल्या गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. बळीराम राठोड यांना तीन अपत्ये असून, त्यात दोन मुले होती. या घटनेत त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिंचाळा गावात शोककळा पसरलीये.टॅग्स

संबंधित बातम्या