महिला बचत गटाच्या माध्यमातून सुलभाताईंनी उभं केलं डाळ मिल मॉडेल
20 March 11:00

महिला बचत गटाच्या माध्यमातून सुलभाताईंनी उभं केलं डाळ मिल मॉडेल


महिला बचत गटाच्या माध्यमातून सुलभाताईंनी उभं केलं डाळ मिल मॉडेल

कृषिकिंग, सोलापूर: कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस काहीही करू शकतो. याचाच प्रत्यय सोलापुरातील माढा तालुक्यात समोर आला आलाय. माढ्याच्या सुलभा कदम या ग्रामीण भागातील महिलेने स्वतःसोबत सहकारी महिलांचाही विकास करण्याची किमया केली आहे. सुलभा यांनी ग्रामीण भागातल्या अर्थकारणात मोलाची भूमिका बजावणारं डाळ मिल मॉडेल उभं केलं आहे.

शहरी भागातील महिलांना नोकरीच्या मोठ्या संधी असतात. मात्र ग्रामीण भागात महिलांना नोकरीची संधी शोधण्यासाठी सुद्धा खूप अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळं स्वतःच्या शेतात राबणं किंवा मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करणं एवढेच काय तो मार्ग असतो. मात्र, या पारंपरिक पध्दतीला छेद देत सुलभा कदम यांनी स्वतःचा डाळ मिल उद्योग उभा केला. यातून त्यांनी रोजगार मिळवला आणि इतरांनाही दिला. घरच्या तुरी वेअर हाऊसमध्ये खराब होत असताना त्यांनी डाळ मिल उभी कऱण्याचा संकल्प केला.

डाळ उत्पादनानंतर त्यांना मार्केटिंगच अनुभव नव्हता. मात्र व्यवहार आणि चातुर्यपणामुळं त्यांना सुरुवातीलाच चांगला नफा मिळाला. त्यामुळं मशीनसाठी पाहुण्याकडून घेतलेले पैसे, पतिकडून घेतलेला कच्चा माल आणि मजुरांचे पैसे लगेच देवून सुलभाताईंनी आठच दिवसात मशीनचे सर्व कर्ज फेडलं.

आज सुलभाताईंचं किमान ४० लाखाचं भागभांडवल आहे. २०१२ साली सुरू केलेल्या व्यवसायाचं आता वटवृक्षात रुपांतर झालं. मात्र यासाठी कदम दाम्पत्यांनी घेतलेल्या अविरत कष्ट जास्त मोलाचं आहे. सुलभाताईंना त्यांचे पती प्रकाश कदम यांनी लाखमोलाचं सहकार्य केलं. पतीनं दिवसरात्र मेहनत करत पत्नीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवल्यानंच आज शेतीच्या भरवशावर उभं राहात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. श्रमिक महिला बचत गटाच्या माध्यमातून सुलभाताईंनी ग्रामीण भागातील महिलांना चांगला रोजगार निर्माण केला. या रोजगारामुळं महिलांनी आपल्या मुलांना इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलं.

सातत्यानं पडणारा दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळं शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. तो निराश होतोय, पण सुलभाताई कदम यांनी सातत्यानं कष्ट करत या निराशेवर नव्या आशेनं मात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन करून मालाला भाव मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करावा. तरच शेतकरी चांगला नफा कमवू शकेल आणि आपले जीवनमान उंचावू शकेल.संबंधित बातम्या