आता...शेतकरी ओटीपीनंतरच मिळवू शकणार डिजिटल सातबारा
05 March 18:52

आता...शेतकरी ओटीपीनंतरच मिळवू शकणार डिजिटल सातबारा


आता...शेतकरी ओटीपीनंतरच मिळवू शकणार डिजिटल सातबारा

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने संगणकावर थेट डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीये. मात्र, आता मोबाईलवरून ओटीपी क्रमांक प्राप्त करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेता येणार आहे. यासंदर्भांतील बदल राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

शासनाच्या ई-फेरफार या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे दिले जात आहेत. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाभूलेखच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल ५१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या ७/१२ आणि ८ अ डिजिटल उतारांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच २ लाख ४० हजाराहून अधिक उतारे डाऊनलोड केले आहेत.

दिवसेंदिवस महाभूलेखच्या संकेतस्थळावर भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल सातबारा उतारे केवळ मोबाईलवर ओटीपी प्राप्त करून घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही एका मोबाईल क्रमांकावरून एका दिवसाला केवळ ३ सातबारा उतारे प्राप्त करून घेता येईल, अशीही अट घालण्यात आली आहे.

मोबाईलवरून उतारे काढून देण्याचा कोणी व्यवसाय सुरू करू नये, या उद्देशाने एका मोबाईलवर केवळ ३ उतारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कामासाठी ७/१२ आणि ८ अ चे उत्तारे आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात १५ रुपये शुल्क भरून उतारे प्राप्त करता येतात. तसेच संकेतस्थळावरून मोफत उतारे मिळवता येतात. सध्या संकेतस्थळावर मोफत उतारे मिळत असले तरी लवकरच उताऱ्यांसाठी शुल्क आकारणी सुरू केली जाणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या