राज्यातील आणखी ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू
22 February 10:10

राज्यातील आणखी ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू


राज्यातील आणखी ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू

कृषिकिंग, मुंबई: २०१८ च्या खरीप हंगामात राज्यात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या गावांना दुष्काळी उपाय योजनांच्या आठ सवलती देण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी, महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या ७५० मिमीपेक्षा कमी झाला आहे. अशा २६८ महसुली मंडळामध्येही राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला आहे. तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५० मिमी पेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या गावांमध्येही आठ उपाययोजना राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

त्यात आता नव्याने पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या व अद्याप दुष्काळसदृश परिस्थिती घोषित न केलेल्या ४५१८ गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळी उपाय योजनांच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या या गावांमध्ये जमीन महसूलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना राबविण्यात येणार आहे. असेही महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या