शहरी भागातील कॉप शॉप उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- सहकारमंत्री
14 February 08:30

शहरी भागातील कॉप शॉप उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- सहकारमंत्री


शहरी भागातील कॉप शॉप उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- सहकारमंत्री

कृषिकिंग, मुंबई: "शेतीमालाच्या थेट विक्रीसाठी राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगट यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे," असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

अटल महापणन विकास अभियानांतर्गत शहरी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप उपक्रमास गती देण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील शहरी भागातील जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहरी भागांमध्ये शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्न धान्य, फळे, भाजीपाला), प्रक्रिया उत्पादने उपलब्ध व्हावीत, यासाठी कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणुकीसाठी सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, त्यांच्या वाहनांना विभागाचे बॅनर लावावेत, तसेच कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करावे आणि ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यात नियोजन राहाण्यासाठी ऑनलाईन ॲप विकसित करावे आणि राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक आणि विभागीय किंवा जिल्हास्तरावर स्थायी स्वरुपात कॉप शॉप सुरू करावेत याचा फायदा थेट शेतकऱ्यांना आणि त्यांच्या संस्थांना शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी होईल. असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.

मुंबईत-६७, ठाणे–१३, पुणे-२०,पनवेल-२ असे कॉप शॉप सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायट्यांपर्यत पोहोचविण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या