शेतकऱ्यांनी पाठवला पंतप्रधान मोदींना १७ रुपयांचा चेक
07 February 11:16

शेतकऱ्यांनी पाठवला पंतप्रधान मोदींना १७ रुपयांचा चेक


शेतकऱ्यांनी पाठवला पंतप्रधान मोदींना १७ रुपयांचा चेक

कृषिकिंग, नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम अत्यंत कमी असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनीच उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींना १७ रुपयांचा धनादेश पाठवला आहे.

'किसान काँग्रेस'चे राष्ट्रीय संयुक्त समन्वयक राजू मान यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मदत नाही तर थट्टा केलीय. सर्वात प्रथम सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि नुकसान झालेल्या पिकांची भरपाई करुन द्यावी. त्यानंतर या निधीत वाढ करुन द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा 'किसान काँग्रेस' शेतकऱ्यांच्या मदतीने तीव्र आंदोलनाला सुरुवात करेल, असाही इशाराही मान यांनी दिला.

"शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. इतक्या पैशांत शेतकऱ्यांचे कुटुंब एका वेळेचा चहाही पिऊ शकत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना १७ रुपयांचा धनादेश पाठविण्याचा निर्णय घेतला आहे... झोपलेल्या सरकारला जाग यावी म्हणून शेतकऱ्यांनी हे धनादेश पाठवला आहे.' असे 'किसान काँग्रेस'चे राष्ट्रीय संयुक्त समन्वयक राजू मान यांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या