देशातील कारखान्यांकडे तब्बल २० हजार कोटींची थकबाकी- इस्मा
05 February 14:05

देशातील कारखान्यांकडे तब्बल २० हजार कोटींची थकबाकी- इस्मा


देशातील कारखान्यांकडे तब्बल २० हजार कोटींची थकबाकी- इस्मा

कृषिकिंग, नवी दिल्ली: "देशात जानेवारी अखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. याशिवाय उसाची एफआरपीची देशपातळीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी अखेरीस थकीत आहे." अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे.

ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, महाराष्ट्रात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटींची थकबाकी होती. यासाठी शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारी रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट बजावले आहे.

राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आंदोलनानंतर कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

राज्यात १९१ कारखान्यांमधून १ फेब्रुवारी अखेरीस ६६१.१८ लाख टन ऊस गाळपातून, ७१ लाख टन साखर उत्पादित झाली. उत्तर प्रदेशात ११७ साखर कारखान्यांमधून ५३.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात ५३.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताऱ्यात ०.८१ टक्के वाढ झाल्याने उत्तर प्रदेशने गेल्या वर्षीची उत्पन्नाची सरासरी गाठली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या