पाणी बचतीतून हिवरेबाजारने ३८ पट अधिक उत्पादन साधले; गावातील ७० कुटुंब कोट्याधीश
27 January 13:00

पाणी बचतीतून हिवरेबाजारने ३८ पट अधिक उत्पादन साधले; गावातील ७० कुटुंब कोट्याधीश


पाणी बचतीतून हिवरेबाजारने ३८ पट अधिक उत्पादन साधले; गावातील ७० कुटुंब कोट्याधीश

कृषिकिंग, अहमदनगर: अहमदनगरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर असलेल्या हिवरे बाजार गावाने आर्थिक समृद्धी साधली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती व लोकसहभागातून गावाचा कायापालट कसा करतो येतो हे पाहायचे असेल तर हिवरे बाजारला भेट द्यायला हवी. गेल्या २४ वर्षांतील अथक प्रयत्नांतून गावाने हे यश संपादन केले आहे.

एक हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या ३१५ उंबऱ्यांच्या या गावाची लोकसंख्या १६५० आहे. येथील दरडोई उत्पन्न ३२ हजार रुपये आहे. मात्र, हे यश साध्य करणे तितके सोपे नव्हते. १९७२ ते १९८२ दरम्यान गावची स्थिती अत्यंत बिकट होती. दरडोई उत्पन्न केवळ ८३२ रु. होते. त्या वेळी सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे लोकांनी गाव सोडले. यादरम्यान पोपट पवार हा तरुण चौथीपर्यंत शिक्षण घेऊन गावाबाहेर पडला होता. क्रिकेटच्या आवडीतून पुढे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यात मजल मारली. अधूनमधून गावी आल्यानंतर त्यांचे मन विषण्ण होत असे. १९८९ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तेव्हा लोकांनी त्यांना उभे राहण्याचा आग्रह धरला. लोकांच्या आग्रहास्तव ते उभे राहिले आणि निवडूनही आले.

सरपंच झाल्यावर पोपटराव पवार यांनी गावच्या विकासकामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. ओसाड माळरान हिरवाईने फुलले पाहिजे, असा प्रण करत सर्वप्रथम त्यांनी डोंगर परिसरात वृक्षारोपण हाती घेतले. माथा ते पायथा या पद्धतीने वनीकरण सुरू केले. २६ जानेवारी १९९० रोजी गावात पहिली ग्रामसभा झाली. त्यात पोपटराव पवारांनी ग्रामस्थांना कार्यक्रमाची रूपरेषा समजावली. वन संरक्षणासाठी कुऱ्हाडबंदी केली. मृद व जलसंधारणाचे कामही सुरू केले. त्या काळात शेतकऱ्यांचा कल ऊस, डाळिंब, केळीसारखी नगदी पिके घेण्याकडे होता. यात पाण्याचा खूप वापर होत असे. यामुळे जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस घटू लागली. यातून मार्ग काढत जलसंधारण, पुनर्भरणाची कामे सुरू केली. गावात ३५० विहिरी व एक तलाव आहे. पुनर्भरणामुळे पाणीपातळी वाढली. जमीन बाहेरच्या व्यक्तीला विकण्यावर बंदी घातली आणि गावाने एकजुटीची मूठ आवळली. जलसंवर्धनात शासनाच्या मदतीने केटीवेअर उभारले. पाळीव जनावरांसाठी चारा मिळू लागला. दुग्धव्यवसाय वाढला.

सध्या गावात रोज ४ ते ५ हजार लिटर दूध उत्पादन होते. विद्यार्थी पाणी वापराचा आढावा घेतात. पाणी वापराची योजना आखली जाते. याची फलश्रुती म्हणजे २४ वर्षांत बाहेर पडलेली ७० कुटुंबे गावात परतली आहेत. हिवरे बाजार आसपासच्या गावांची पाण्याची गरजही भागवत आहे. गावातील व्यवसायात दूध व्यवसायाचा वाटा ८९% आहे. गावात दारूबंदीही केली. भविष्यातील योजनांबाबत पोपटराव पवार म्हणाले, ग्रामसभेत पुढील वर्षाची योजना आखली. बारमाही पाणी मिळणे कठीण झाल्याने ८ महिने पीक घेण्याचा पर्याय समाेर आला. व त्यात चार पिके कोणती असावीत यावर कृषितज्ज्ञ अभ्यास करत आहेत.संबंधित बातम्या