राज्याला ना पूर्णवेळ कृषिमंत्री... ना कृषी सचिव; कारभाराला खीळ
17 January 14:56

राज्याला ना पूर्णवेळ कृषिमंत्री... ना कृषी सचिव; कारभाराला खीळ


राज्याला ना पूर्णवेळ कृषिमंत्री... ना कृषी सचिव; कारभाराला खीळ

कृषिकिंग, पुणे: राज्याच्या कृषी खात्याला पूर्णवेळ मंत्री आणि सचिव नसल्याने कारभाराला खीळ बसली आहे. गेल्या सात महिन्यांपासून कृषी मंत्रिपदाचा आणि चार महिन्यांपासून सचिवपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल ही राजकीय बाब समजून कृषिमंत्री नियुक्तीकडे पाहिले तरी, पूर्णवेळ सचिव नियुक्ती रखडवण्याचे कारण काय, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामुळे राज्याच्या कृषी खात्याच्या कारभाराला एक प्रकारे खीळ बसली आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे २०१८ रोजी निधन झाले. फुंडकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला. महसूल, मदत आणि पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम अशा वजनदार खात्यांमुळे पाटील यांना गेल्या सात महिन्यांत कृषी खात्याला न्याय देता आलेला नाही. तर अतिरिक्त मुख्य सचिव बिजयकुमार हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आजपर्यंत कृषी खात्याला पूर्णवेळ सचिव मिळालेला नाही. जलसंधारण, रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

राज्याच्या कृषी खात्याचा व्याप मोठा आहे. खात्यामार्फत वर्षभर शेतकरी, नागरिकांशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण योजना, कार्यक्रम सुरू असतात. खरीप, रब्बी हंगाम आदींचे पूर्वनियोजन आवश्यक असते. याचे थेट परिणाम राज्यात शेतकऱ्यांच्या जनजीवनावर होत असतात. त्यातच यावर्षी राज्यात या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती आहे. अशा परिस्थितीत कृषी खात्याच्या यंत्रणेमार्फत राज्यातील शेतकरी, नागरिकांना दिलासा देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.संबंधित बातम्या