साखर उद्योगासाठी केंद्र सरकार पुन्हा पॅकेज घोषित करणार
08 January 17:30

साखर उद्योगासाठी केंद्र सरकार पुन्हा पॅकेज घोषित करणार


साखर उद्योगासाठी केंद्र सरकार पुन्हा पॅकेज घोषित करणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकार लोकसभा निवणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजगी दूर करण्याच्या तयारीत आहे. त्याअनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढती थकबाकी देण्यासाठी पुन्हा एकदा सहायता पॅकेज देण्याचे निश्चित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार साखर कारखान्यांना जवळपास १० हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय साखरेच्या दरात वाढ कारण्याचा निर्णयही सरकारकडून घेतला जाणार आहे.

केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ६ टक्के व्याज दराने हे १० कोटींचे कर्ज कारखान्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. हे कर्ज कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करण्यासाठी तसेच प्लांट उभारणीसाठी ही दिले जाणार आहे. याशिवाय साखरेच्या दरात २९ रुपयांवरून ३२ रुपये प्रति किलो करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी कॅबिनेट बैठकीत या निर्णयाची घोषणा केली जाऊ शकते.

चालू गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये आतापर्यंत देशातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ११ हजार कोटींची थकबाकी आहे. परिस्थिती अशीच राहिली तर एप्रिल ही थकबाकी २० हजार कोटींच्या घरात जाऊ शकते. दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात साखर कारखानदारीसाठी ५ हजार ५०० कोटींचे पॅकेज घोषित केले होते. तर जून २०१८ मध्ये केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी ८ हजार ५०० कोटींचे पॅकेज घोषित केले होते. याशिवाय सरकारने इथेनॉलच्या खरेदी मूल्यात वाढ करण्यासह, साखरेच्या आयातीवरील शुल्कात वाढ करून ते १०० टक्के इतके सर्वाधिक केले होते.टॅग्स

संबंधित बातम्या