राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन २ फेब्रुवारीला जालन्यात; खोतकर यांची माहिती
08 January 11:17

राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन २ फेब्रुवारीला जालन्यात; खोतकर यांची माहिती


राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन २ फेब्रुवारीला जालन्यात; खोतकर यांची माहिती

कृषिकिंग, मुंबई: "पशूपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशूपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जालना येथे २ ते ४ फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे." अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

संपूर्ण देशातील सुमारे २ हजार वेगवेगळ्या जातीच्या पशुधनाचे एकत्रीत प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनामध्ये आपल्या राज्यातील तसेच अन्य राज्यातील उत्तमोत्तम आणि जास्त दूध देणाऱ्या जातीच्या गायी व म्हशी तसेच शेती व ओढ कामासाठी अतिशय चांगली व उपयुक्त असलेले बैल, विविध जातींचे अश्व, वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या राज्यातील शेळ्या व मेढ्या, परस कुक्कुट पालन व व्यावसायिक कुक्कुट पालन यासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या, व्यावसायिक वराह पालनासाठी उपयुक्त असलेले विदेशी व संकरीत जातींचे वराह, वेगवेगळ्या जातींची कुत्री अशा सर्व प्रकारच्या पशूधनाचा प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. अशी माहितीही खोतकर यांनी दिली आहे.

जातिवंत घोड्यापासून ते सश्यापर्यंत सर्व पशूधन या प्रदर्शनात असणार आहेत. सुलतान, युवराज यासारख्या कोटी कोटी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे. जवळपासच्या बाहेरील राज्यातील १ हजार पशूधन सहभागी होणे अपेक्षित आहेत. ३ दिवसांच्या प्रदर्शनाला दररोज किमान ५० हजार प्रेक्षक, शेतकरी व पशूपालक भेट देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रदर्शामध्ये पशूपालन व्यवसाय करताना, आवश्यक असलेली विविध उपकरणे, वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त औषधे आणि लसी, चारा व वैरणीचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम प्रकारचे बियाणे/गवताचे ठोंब, हिरवा तसेच वाळलेला चारा साठवून ठेवण्याच्या पद्धतीची माहिती मिळणार आहे. चारा टंचाईचा मुकाबला करण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन व्यवसाय किफायतशीरपणे करण्यासाठी मुक्त संचार, गोठा तसेच मिल्क पार्लर व स्वच्छ दूध उत्पादन-जंतू विरहित दूध उत्पादन तंत्रज्ञान एकत्रीत बघायला मिळणार आहे. आधुनिक पद्धतीचे शेळी-मेंढी पालन या विषयांची माहितीसह नव्या बियाणे, व इतर निविष्ठा विविध कंपन्यांच्या स्टॉल्समधून उपलब्ध होणार आहेत.



संबंधित बातम्या