लाखणगाव येथे कृषीविभाग आणि 6th Grain द्वारे अमेरिकन लष्करी अळीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
04 December 20:26

लाखणगाव येथे कृषीविभाग आणि 6th Grain द्वारे अमेरिकन लष्करी अळीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


लाखणगाव येथे कृषीविभाग आणि 6th Grain द्वारे अमेरिकन लष्करी अळीबाबत  शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषिकिंग, आंबेगाव (पुणे): राज्यात अमेरिकन लष्करी अळीने मका, ज्वारी आणि उसावर थैमान घातले असून विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी सोलापूर मध्ये दिसणारी ही परदेशी कीड आता राज्यभर दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. आंबेगाव (पुणे) तालुक्यातील लाखणगाव आणि पंचक्रोशीतील परिसरात देखील या अळीचा वावर मोठ्या प्रमाणात मका (चाऱ्यासाठी, बेबीकॉर्न आणि स्वीटकॉर्न) पिकावर दिसून येत असल्याचे निदर्शनास आल्याने, कृषीविज्ञान केंद्र (नारायणगाव) आणि 6th Grain द्वारे काल (३ डिसेंबर) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मका पिकामध्ये चाऱ्यासाठी मोठी समस्या उद्भवत असल्याची चिंता लाख्न्गाव येथील शेतकरी श्री. केरभाऊ गाडगे यांनी व्यक्त केली. क्षेत्र सर्वेक्षण करताना श्री लहू पडवळ यांच्या बेबीकॉर्न मका पिकात मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा फैलाव झाल्याचे दिसून आले. परदेशी कंपनीचे महागडे बियाणे घेऊन बेबीकॉर्न ची व्यावसाईक रित्या लागवड करणारे बरेच शेतकरी आंबेगाव तालुक्यात आहेत. मात्र अशा प्रकारे नुकसान झाल्याने, मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंत श्री. पडवळ यांनी कृषिकिंग सोबत बोलताना व्यक्त केली.

याबाबत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे कृषीकीटक शास्त्रज्ञ, डॉ. दत्तात्रय गावडे यांनी, 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषीविभागास संयुक्त निवेदन द्यावे, म्हणजे नुकसान भरपाई बाबत कार्यवाही होऊ शकेल' अशी माहिती दिली. 6th Grain संस्थेने तयार केलेल्या राज्यातील ऑनलाईन नकाशाबाबत, डॉ. नरेश शेजवळ यांनी शेतकरी आणि कृषीसहायक यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी अधिकाधिक सजग राहून सदर अळी दिसताच ०२२४०३७५७९१ या टोलफ्री क्रमांकावर मिसकॉल द्यावा आणि आलेल्या लिंकवर शेतातून फोटो पाठवावा असेही आवाहन त्यांनी केले. या लिंकच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये राज्यातील १२ हुन अधिक जिल्हातून ऊस, मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती दिली असून त्याचा ऑनलाईन गुगल नकाशा हा सर्वांना पाहण्यासाठी या लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.google.com/maps/d/u/0/edit?mid=18_eiwUisJ-DVuZS_n-x6Rxu9n7QnEe73&ll=19.545009740425094%2C74.29931709366929&z=6&fbclid=IwAR19RT31TGu9Y3wyRb0rnXS8S03E6FgYlI20sZZf7MO5KEizwgIsTPpMOf4

सदर कार्यक्रमास कृषीसहायक प्रवीण मिरके, सुनील लोहकरे, रामचंद्र गोल्हे, संजय घुले यांनी क्षेत्र पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद केला.अविनाश जांभळे यांनी किडीचे नमुने गोळा केले तर श्री. किसन टाव्हरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.संबंधित बातम्या