आता कोल्हापूर जिल्ह्यात 'ज्वारी' वर अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची नोंद
27 October 17:24

आता कोल्हापूर जिल्ह्यात 'ज्वारी' वर अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची नोंद


आता कोल्हापूर जिल्ह्यात 'ज्वारी' वर अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची नोंद

कृषिकिंग, कोल्हापूर: मका आणि उस उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडविणाऱ्या अमेरिकन लष्करी अळी या विदेशी किडीने महाराष्ट्रात आपला मोर्चा आता ज्वारी पिकाकडे वळवला आहे. कर्नाटक मध्ये सदर किडीची ज्वारीवर नोंद नुकतीच झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही ही कीड ज्वारीवर दिसू लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कागल (कोल्हापूर) तालुक्यातील व्हन्नूर या गावातील शेतकरी प्रवीण चौगुले यांच्या ज्वारीच्या शेतात सदर अळी आढळून आली. 6th Grain या संस्थेचे कृषीतज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी या किडीची नुकतीच नोंद केली. कागल परिसरात मका आणि उस या पिकावर देखील सदर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. चोरमुले यांनी शेतकरी, तसेच स्थानिक कृषीसहाय्यक आणि कृषीमंडळ अधिकारी याना कीड ओळखण्याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन दिले. तसेच नियंत्रण करण्यासाठीच्या शिफारसी सांगितल्या.

नर पतंग पकडण्यासाठी फेरोमोन सापळ्याचा प्रयोग:
दरम्यान, श्री. चौगुले यांच्या ज्वारीच्या शेतात अमेरिकन लष्करी अळी' चे नर पतंग पकडण्यासाठी, प्रायोगिक तत्त्वावर 'फेरोमोन सापळा' लावण्याचे प्रात्यक्षिक शेतकरी व कृषीसहायक तसेच इतर अधिकारी वर्गास सादर केले. आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी हेक्टरी ५ ते ८ सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २० सापळे लावावेत अशी माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा-
https://www.youtube.com/watch?v=EjUQYJPVF0c

बाधित क्षेत्राचा चा ऑनलाईन डिजिटल नकाशा
6th Grain संस्थेकडून, अमेरिकन लष्करी अळी बाधित क्षेत्राचा चा ऑनलाईन डिजिटल नकाशा बनविण्यात येत असून सदर नकाशा सर्व शेतकरी, कृषीअभ्यासक आणि विद्यापीठ तसेच कृषीविभागास उपलब्ध केला जाईल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सदर कीड दिसून आल्यास शेतात जाऊन 02240375791 या क्रमांकावर मिसकॉल द्यायचा आहे. त्यावर आलेल्या मेसेज मध्ये असणाऱ्या लिंकवर क्लिक करून पेजवर आपल्या पिकाची माहिती देऊन पिकाचा फोटो काढायचा आहे. सदर फोटोमध्ये अळी, अंडीपुंज, पतंग अथवा पिकाची खाल्लेली पाने दिसावीत असा स्पष्ट फोटो काढावा. फोटो अपलोड केल्यानंतर फोटोचे भौतिक स्थान (अक्षांश रेखांश) याबाबत माहिती आपोआप पाठविली जाते आणि बाधित क्षेत्र हे ऑनलाईन नकाशावर दिसू लागते.
सदर लिंकवर शेतकरी फोटो पाठवू शकतात - http://bit.ly/2D57deg

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
अमेरिकन लष्करी अळी (Spodoptera frugiperda) ही मुळची अमेरिकेतील कीड भारतात नवीन असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांना तसेच कृषीसहायकांना याबाबत नेमकी माहिती नाही. त्यामुळे सदर किडीची ओळख करण्यात अडचण येत आहे. मात्र किडीने ग्रस्त झालेले पिक, किडीचे भौतिक गुणधर्म इ. बाबत माहिती घेतल्यास सदर कीड ओळखता येणे सहज शक्य आहे.

सदर किडीचा प्रादुर्भाव मका वगळता इतर पिकांवर अजून मोठ्या प्रमाणात नसला तरीही या किडीचे अस्तित्त्व इतर पिकांमध्ये झपाट्याने दिसू लागणे, ही चिंताजनक बाब आहे. किडीचा प्रादुर्भाव किती क्षेत्रावर आणि कोणत्या पिकावर झाला आहे हे लक्षात आल्यास संबंधित यंत्रणांना त्वरेने काम करण्यास सोपे होईल. तसेच खास करून मका पिकामध्ये जास्त नुकसान झाले आहे अशा उत्पादकांना त्वरेने मदत मिळणेही गरजेचे आहे.संबंधित बातम्या