हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच; खरेदी केंद्रच अस्तित्वात नाही
14 September 17:15

हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच; खरेदी केंद्रच अस्तित्वात नाही


हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच; खरेदी केंद्रच अस्तित्वात नाही

कृषिकिंग, लातूर: हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात अजूनही हमीभाव अधांतरी आहे. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाजारात आणला असून, मुगाच्या थप्प्या लागल्या आहेत. परंतु हमीभावापेक्षा क्विंटलमागे २००० रुपये कमी दरानेच विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे हमीभावाच्या घोषणा बाजारगप्पाच राहिल्या आहेत. असेच म्हणावे लागेल.

केंद्र सरकारने चालू खरीप हंगामासाठी मुगाला ६९७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला. परंतु हमीभावाने खरेदी करणारे केंद्रच अस्तित्वात नाहीत. लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी बाजार समिती आहे. दररोज सुमारे १० हजार क्विंटलपेक्षा अधिक मूग येथील बाजारात विक्रीसाठी येत आहे. परंतु हमीभाव केंद्रच सुरू झालेले नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यापूर्वी शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एकट्या लातूरच्या बाजार समितीत २८ कोटींपेक्षा उलाढाल ठप्प झाली होती.

सध्याच्या कायद्यामध्ये कारवाईची तरतूद नसल्याचे राज्याच्या पणन संचालकांनी कळविल्यानंतर बाजार सुरू झाला. मुगाची आवक वाढली. मात्र भाव घसरला. जिथे हमीभाव ६९७५ रुपये आहे तिथे शेतकऱ्यांच्या पदरी ४८०० रुपये मिळत आहे. शासनाच्या प्रस्तावित निर्णयामुळे ११ दिवस बंद राहिलेला बाजार त्यानंतर बाजारात झालेली घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. अजून उडीद, सोयाबीन यायचे आहे. त्यांच्याही हमीभावाचे आकडे शासकीय दफ्तरीच राहतील की काय, अशी स्थिती आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. त्यामुळे ते पुन्हा कर्जबाजारी होतील, अशी स्थिती आहे. हमीभाव केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. अन्यथा कमी दराने का होईना, शेतमाल विकणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढे राहिला आहे. सरकार शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाच्या जवळही घेऊन जाऊ शकले नाही. उलट हक्काचा हमीभावही मिळू शकत नाही. पावसाने दिलेल्या ताणामुळे शेतकरी कायम चिंतेत आहे. एकतर पिकतच नाही अशी स्थिती, पिकले तर घसरलेला भाव माथी मारला जातो. अशा विचित्र कोंडीतून शेतकऱ्यांची काही केल्या सुटका होत नाही.संबंधित बातम्या