केरळमध्ये पावसाचा हाहाकार, २२ जणांचा मृत्यू
10 August 10:34

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, २२ जणांचा मृत्यू


केरळमध्ये पावसाचा हाहाकार, २२ जणांचा मृत्यू

कृषिकिंग, तिरुवनंतपुरम(केरळ): केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्कीमध्ये भूस्खलन होऊन १० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मलप्पुरममध्ये ५, कन्नूरमध्ये २ आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, वायनाड, पलक्कड आणि कोझिकोड याठिकाणी काही लोक बेपत्ता झाल्याचे समजते. तर, इडुक्कीमधील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील पूरस्थिती गंभीर असून, राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वेळी २४ धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, आर्मी, नेव्ही, कोर्ट गार्ड आणि एनडीआरएफकडून पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी रात्री मुख्यमंत्री विजयन यांना फोन करून पुरस्थितीचा आढावा घेतला. आणि आपत्कालीन परिस्थितीत केरळला सर्वोतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन दिले.

दरम्यान, या पावसामुळे केरळमधील विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील शाळा, कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर, मुसळधार पावसामुळे इडुक्की येथील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे २६ वर्षांनंतर खुले करण्यात आले आहेत. गुरुवारी या धरणातून ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले.संबंधित बातम्या