भगवान कोकरेंची गोधन श्रीमंती; जखमी-भाकड गाईंची गोशाळा...
25 February 14:55

भगवान कोकरेंची गोधन श्रीमंती; जखमी-भाकड गाईंची गोशाळा...


भगवान कोकरेंची गोधन श्रीमंती; जखमी-भाकड गाईंची गोशाळा...

कृषिकिंग, रत्नागिरी: घराच्या पडवीत किंवा गोठ्यात बांधलेली दोन-चार जनावरे पाळणेही लोकांना कठीण जाते. पण रत्नागिरी जिल्ह्यात असा एक अवलिया आहे, जो थोड्या-थोडक्या नाही तर तब्ब्ल ४५० हून अधिक गायी सांभाळत आहे. विशेष म्हणजे या गायी त्यांच्या स्वतःच्या नसून इतरांनी नाकारलेल्या, सांभाळायला जड झालेल्या किंवा रस्ता अपघातात जखमी झालेल्या गायी आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे परशुराम इथल्या भगवान कोकरे यांची ‘श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान’ या नावाची एक गोशाळा आहे. ही गोशाळा २००८ साली सुरू झाली. सुरूवातीला या गोशाळेत फक्त ४ गायी होत्या. मात्र गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर कत्तलखान्याकडे न गेलेल्या आणि अपघातात जखमी झालेल्या ४५० गायी सध्यस्थितीत या गोशाळेत आहेत. दहा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर कत्तलखान्यात जाणारा ट्रक लोकांनी पकडला. पण तांत्रिक अडचणीमुळे या गायी पुन्हा कत्तलखान्याकडेच जाणार, हे जेव्हा स्पष्ट झाले, तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता कोकरे यांनी त्या सर्व गाईंची जबाबदारी उचलली आणि इथूनच सुरु झाला त्यांचा गोधन संचय...

रस्त्यात अपघातात जखमी झालेल्या मरणासन्न अवस्थेत गेलेल्या गायी कोणीच पाहत नाही, म्हणून कोकरेंच्या आवारात येऊ लागल्या. यातूनच मग स्थानिक पातळीवर कुठेही जनावर जखमी झाले, की त्यांचे पालकत्व स्वीकारणारा माणूस म्हणून त्यांची ओळखच बनली. कोकरे जनावरांना जीवापाड जपतात अशी ओळख निर्माण झाल्याने कोकणात गावातील अनेक शेतकरी आर्थिक स्थितीने गायी-गुरं सांभाळणे झेपत नसल्याने कोकरेंकडे आणून देऊ लागली. एक-एक करत गायींची संख्या ४५० च्या पार गेली आहे.

चिपळुणमध्ये स्वतःचे एक दुकान आणि प्रवचनाची आवड असलेले कोकरे दुकान आणि प्रवचनातून होणाऱ्या अर्थार्जनातूनच हा सारा व्याप सांभाळतात. कोकरेंच्या या कामात त्यांना मदत करण्यासाठी आता या परिसरातील अनेक सुशिक्षित तरुण मंडळी पुढे येत आहेत. आता ही गोशाळा पहायला येणारी मंडळी मदत करतात. पण ती अगदीच तुटपुंजी असते. गायींचा चारा-औषध उपचार यासाठी या मंडळींना दारोदार भटकावेच लागते.

गोधनाने कोकरे श्रीमंत झाले खरे, मात्र या ४५० गाईंना रोज काय खायला घालायचे, त्यांचे पालनपोषण कसे करायचे, या विचाराने ते तितकाच अस्वस्थही आहे. सरकारने गोवंश हत्येबाबत कायदा केला पण भाकड झालेल्या गाईंचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झालाय? त्यांचे संगोपन कोणी आणि कसे करायचे? याबाबत सरकारच्या पातळीवर मात्र पूर्ण उदासीनता आहे. कोकरेंच्या आवारात असलेल्या सर्वाधिक गायी या शेतकऱ्यांनी आता गुरे सांभाळणे परवडत नसल्याने त्यांच्याकडे आणून सोडली आहेत. कोणाला तरी विकली तर कत्तलखान्यात जातील त्यापेक्षा कोकरेंकडे जिवंत राहतील, म्हणून आणून सोडली जात आहेत. केवळ कामाचे कौतुक करुन कोरड्या शुभेच्छांनी आपली जनावर सोडून काही लोक जात आहेत. तर राजकीय पक्ष, नेतेही कोरडी सहानुभूती दाखवतात, पण प्रत्यक्ष मदत होतच नाही, हा कोकरे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मंडळींचा आजवरचा अनुभव आहे. गोवंश हत्याबंदी नंतर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. प्रस्ताव मागवण्यात आले. पण शासनाकडून अजूनही मदत मिळालेली नाही.

इथे आलेली बहुतांश जनावरे जखमी असतात. कोकरेंच्या आवारात अनेक आंधळी जनावरे आहेत, तर काही पायाने पूर्णतः अधू… काहींना त्वचा रोग झाले आहेत. त्या सगळ्यांवर इथे उपचार होत आहेत. ४५० हून अधिक गायी सांभाळण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भगवान कोकरे यांच्याकडे स्वतःची जमीनही नाही.

लोटे औद्योगिक वसाहतीच्या ग्रीन झोनमध्ये ते हे सारे गोधन सांभाळतात. त्यामुळे इथे विद्युत पुरवठाही नाही. जेणेकरून शेण-गोमूत्र यावर प्रक्रिया करुन त्यातूनही अर्थार्जन करता आले असते. पावसाळ्यात कोकणातल्या हिरव्या चाऱ्यावर दिवस जातात. पण उन्हाळ्यात समस्यांचा डोंगर उभा राहतो. जमा झालेल्या प्रचंड गोधनाची ही श्रीमंती आहे, पण त्यांना जगवायचे कसे, ही भ्रांत कोकरे यांना सतत सतावत आहे.



संबंधित बातम्या