गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे- महाडिक
30 December 11:55

गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे- महाडिक


गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे- महाडिक

कृषिकिंग, नवी दिल्ली: ‘‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये, तर दूध पावडरला सात रुपये अनुदान मिळावे आणि शालेय पोषण आहारात दूध पावडरचा समावेश करावा. शालेय पोषण आहारात दूध पावडरचा समावेश केल्यास त्याचा विद्यार्थी आणि दुध उत्पादक शेतकरी दोघांनाही फायदा होईल.’’ अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडताना त्यांनी देशातील एकूण दूध व्यवसायासमोरील आव्हाने पीठासीनासमोर मांडली आहेत.

दरम्यान, ‘गोकुळ’च्या राजकीय संघर्षातून ७ डिसेंबरला कोल्हापुरात गोकुळ दूध उत्पादकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी खासदार महाडिक यांनी दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी संसदेत आवाज उठणार असल्याचे जाहीर केले होते.

‘‘भारत जगभरात दूध उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. जगातील दूध उत्पादनापैकी १७ टक्के हिस्सा भारताचा आहे. देशभरात १७७ मिल्क फेडरेशन असून, १५ दूध मार्केटिंग फेडरेशन काम करीत आहेत. संपूर्ण देशात दीड लाख दूध संकलन आणि विक्री संस्था काम करीत असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणात दुग्ध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. देशातील सात कोटी लोक दुग्ध व्यवसायाशी निगडित असून, सुमारे सात कोटी लोकांचा रोजगार केवळ याच क्षेत्रावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे, विशेषतः महिला दुग्ध व्यवसायात उत्तम काम करीत आहेत. तरीही दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत असून, त्याला शासनाने आधार देण्याची गरज आहे.” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

देशात एच. एफ., मुऱ्हा, जाफराबादी अशा जातीच्या गायी-म्हशींचे पालन केले जाते. मात्र, या जनावरांचे पशुखाद्य, औषधे यांच्या किमती मोठ्या असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बाजारातील सध्याचे दूध दर पाहता दूध उत्पादक शेतकरी नुकसानीत आला आहे. “शासकीय धान्य गोदामातील खराब धान्य स्वस्त दरात पशुखाद्य बनविण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, ज्या योगे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे.



संबंधित बातम्या