कापूस, धान, फळबाग, भाजीपाला नुकसानग्रस्तांना मदत जाहीर
23 December 10:45

कापूस, धान, फळबाग, भाजीपाला नुकसानग्रस्तांना मदत जाहीर


कापूस, धान, फळबाग, भाजीपाला नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

कृषिकिंग, नागपूर: “बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत, धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल,” अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.

“कापसाला दिली जाणारी मदत ही एनडीआरफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक), पीक विमा योजना व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत मिळणारी मदत, असे तिन्ही एकत्रित करून दिली जाईल. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३० हजार ८०० रुपये मिळतील. बागायती कापूस उत्पादकाला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ५०० रुपये मिळतील. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असणार आहे.” अशी माहितीही कृषिमंत्री फुंडकर यांनी दिली आहे.

“कोरडवाहू धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६८०० रुपये व पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण ७ हजार ९७० रुपये मिळतील. ओलिताच्या धान उत्पादकांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण १४ हजार ६७० रुपये मिळतील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल व ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल,” असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.

याशिवाय फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत १८ हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकुण ४३ हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाईल. तसेच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये इतकी मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या