६ डिसेंबर: महामानवाचा महापरिनिर्वाण दिन
06 December 12:14

६ डिसेंबर: महामानवाचा महापरिनिर्वाण दिन


६ डिसेंबर: महामानवाचा महापरिनिर्वाण दिन

कृषिकिंग, पुणे: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बहुजणांचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्य विधाते, बोधिसत्व, महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन...
कोटी कोटी प्रणाम...

आजच्या दिवशी ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलिपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेत बाबासाहेबांचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पार्थिव विमानातून रात्री सव्वा तीन वाजता मुंबईत आणण्यात आले. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधे त्यांचे पाथिर्व ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अॅम्ब्युलन्समधे खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले होते. पाच वाजून पाच मिनिटांनी अॅम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहात होते. धीरगंभीर वातावरणात बुद्धं शरणं गच्छामीचा घोष होत होता. प्रचंड गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना अशक्य झाले होते. सव्वापाच वाजता बाबासाहेबांचे पाथिर्व अॅम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले.

तेव्हा जनसमुदायाच्या अश्रुंचा बांध फुटला. अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली. सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे बारा लाख लोक त्यात सामील झाले होते. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षा विधी झाला.

त्यामुळे दादरमध्ये स्थित चैत्यभूमी येथे भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ असून, हा स्तूप आंबेडकरवादी आणि बौद्ध अनुयायांचे हे प्रमुख श्रद्धास्थान आहे. आजच्या दिवशी लाखो आंबेडकर अनुयायी या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात.संबंधित बातम्या