शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन
13 May 09:00

शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन


शेळ्यांसाठी चारा व्यवस्थापन

शेळ्यांचे चारा व्यवस्थापन करतांना चारा वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी. शेळ्यांचा खालचा जबडा नाजूक असल्याने शेळ्या कडक पदार्थ सहसा खात नाहीत. शेळ्यांचा हिरवा चारा नेहमी एक ते दीड इंचाचे तुकडे करून गव्हाणीत टाकावेत यामुळे चारा वाया जाणार नाही. शेळ्यांची संख्या, वय याचे गणित करून रोज किती चारा त्यांना लागतो त्याप्रमाणे होणारा चारा कापून दिवसातून दोनदा सकाळी व सायंकाळी अर्धा अर्धा गव्हाणीत टाकावा. चारा टाकायची वेळ निश्चित करावी. मधल्या काळात सुका चारा आणि खुराक द्यावा. समजा १०० मोठ्या शेळ्या आहेत सरासरी चार किलो प्रमाणे चारशे किलो चारा दररोज लागेल. त्यापैकी लसूण किंवा बरसीम गवत २०० किलो आणि यशवंत गवत २०० किलो चारा तुकडे करून २०० किलो सकाळी व २०० किलो सायंकाळी गव्हाणीत घालावा. शेळी चार पोट असलेला प्राणी आहे त्यामुळे जास्त चारा घातल्यास तो सर्व चारा खाऊन टाकेल व त्यामुळे पोटफुगी होण्यास सुरुवात होईल. हिरवा चारा घालतांना त्यात थोडा खाण्याचा सोडा वरवर घालावा. तसेच करडांचेही गणित करून अर्धा अर्धा चारा सकाळी व संध्याकाळी विभागून द्यावा. सकाळचा चारा गव्हाणीतून संपला असेल तर एक तासाने एक किलो सुका चारा घालावा व तो संपल्यानंतर पुन्हा २ किलो हिरवा चारा घालावा. चारा शिल्लक राहत असल्यास तो शेळ्यांना आवडला नाही किंवा त्यात कडक पदार्थ आहेत का याची शहानिशा करावी. सोयाबीन अथवा भूईमुगाचा सुकविलेला चारा जादा घालावा कारण त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते. चारा नसेल त्यावेळी झाडाच्या फांद्या तोडून हिरवी पाने खायला देऊन खाद्याची पूर्तता करावी.

डॉ. गोविंदराव लोखंडे, माजी उपायुक्त, पशुसंवर्धनटॅग्स

संबंधित बातम्या