जनावरातील लसीकरण
01 May 09:00

जनावरातील लसीकरण


जनावरातील लसीकरण

-लसीकरणापूर्वी घ्यावयाची काळजी:
• कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी, आठवडाभर आधी जंतनाशक औषध द्यावे.
• जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाश्या, उवा, लिखा, पिसवा इ. कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा करावा.
• बैलाच्या शरीरावर ताण पडू नये म्हणून लसीकरणानंतर एक आठवडा बैलांना हलके काम द्यावे. उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.
• लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये थोडे दिवस कॉरटीकोस्टेरॉईड/प्रतिजैविकांचा वापर करू नये. लसीकरण केल्यानंतर जनावरांचे अति उष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे तसेच दूरवरची वाहतूक टाळावी.
• लसीकरणानंतर जनावरांमध्ये ताप येणे किंवा मान न हलवणे अशी लक्षणे आढळतात; परंतु ही लक्षणे तात्कालिक व सौम्य स्वरुपाची असतात. लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून त्या जागेवर हलके चोळावे. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकले, तर गाठ जिरुन जाते. मांसात द्यायच्या लसी मांसातच टोचाव्यात, तसेच कातडीखाली टोचायच्या लसी कातडीखालीच टोचाव्यात; अन्यथा गाठी येण्याचे प्रमाण वाढते.
लस दिल्यानंतर लसीमुळे गाभण जनावरे गाभडतात असे नसून सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्वाचे आहे. विशेषत: आंत्रविषार व धनुर्वांताची लस गाभण शेळ्या-मेंढ्यांना दिल्यामुळे विल्यानंतर जनावरांना व पिलांना हे आजार होत नाहीत. कारण, नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारकशक्ती मिळते. लसीकरणामुळे येणारा ताप व शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते; परंतु ते केवळ १ ते २ दिवसच राहते, नंतर पूर्वीप्रमाणेच दूध उत्पादन मिळते.

लसीकरण करतानाची काळजी
• लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरु नये. जनावराला ठरवून दिलेल्या मात्रेमध्येच लस द्यावी. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरु नये.
• लस ही नेहमी थंड, कोरड्या ठिकाणी ठेवावी. (फ्रिजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात ठेवू नये.) लस एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ने-आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणावी.
• उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. सारख्याच प्रमाणात द्यावी. दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या जागेवर टींक्चर आयोडीन/ स्पिरिट लावू नये.लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सीरिज या उकळल्या पाण्यात निर्जतुक केलेल्या असाव्यात, त्यांना कोणतेही रसायन लावू नये.
• लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून संपवावी. शिल्लक लसीचा साठा करू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी (सकाळी किंवा सायंकाळी) करावे.
साथीनंतर लसीकरणाचा फायदा होतो का?
जनावरांना रोग होण्याची वाट न बघता ठरलेल्या वेळी वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण करावे. रोगाची साथ येण्याअगोदर लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्याअगोदरच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते व होणारे नुकसान टाळता येते.

लसीकरणासाठी योग्य वय:
घटसर्प व फ-या या रोगांचे लसीकरण सहा महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरांत करावे. लाळ्या-खुरकत रोगाचे लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरांना व त्यापुढील जनावरांना करावे.
आंत्रविषार या रोगाची लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराला पहिल्या आठवड्यात द्यावी आणि दिली असेल, तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी.

-स्त्रोत : विकासपिडिया.टॅग्स

संबंधित बातम्या