अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- उत्पादन कसे कराल?
23 April 07:30

अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- उत्पादन कसे कराल?


अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- उत्पादन कसे कराल?

घरच्या घरी पाहिजे तेवढ्या प्रमाणात व अत्यंत कमी खर्चात अॅझोला तयार करून इतर महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून वापर करता येते, तसेच जनावरांचे आरोग्यही मिळविता येते; परंतु अजूनही पशुपालक शेतकऱ्यांत अॅझोलाबद्दल पाहिजे तेवढी जागरूकता नाही.

अॅझोला तयार करण्यासाठी सामग्री:
गायीचे किंवा म्हशीचे शेण बांधावरची किंवा शेतातील माती गोमूत्र पाणी सिंगल सुपर फॉस्फेट अॅझोला कल्चर उत्पादन घेण्यासाठी तात्पुरता किंवा कायम स्वरूपाचा वाफा प्रति दिवस एक किलो अॅझोला उत्पादनासाठी 6 फूट लांब 4 फूट रुंद आणि 1 ते 1.5 फूट खोल वाफा तयार करावा. सदर वाफा पक्क्या बांधकामाचा करावा अन्यथा त्याला आतून प्लास्टिक लावावे.

या वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो शेण, एक टोपली बांधातील किंवा शेतातील माती आणि सिंगल सुपर फॉस्फेट 100 ग्रॅम एकत्र मिसळावे त्यात गोमूत्र घालून वाफा पाण्याने भरावा. वाफ्यात नेहमी अर्धा फूट पाण्याची पातळी राहील अशी व्यवस्था करावी. या वाफ्यामध्ये 1 ते 2 किलो अॅझोलाचे कल्चर सोडावे. वाफ्यावर 50 टक्के सावली ठेवावी. 8 ते 10 दिवसांनी अॅझोला पूर्ण वाफ्यावर पसरतो रोज अर्धा ते एक किलो प्रमाणे काढणी करावी.

अॅझोला तयार करण्याची पद्धती:
जमिनीखाली खड्डा : या प्रकारात जमिनीमध्ये 1 फूट खोल खड्डा तयार करून त्यामधील माती चारही बाजूने बांधबंधिस्तीसाठी वापरली जाते. यामध्ये 50 मायक्राँन जाडीचा प्लास्टिक कागद लावावा. कागदाचे चारही कोपरे मातीने झाकून घेतले जातात. या वाफ्यामध्ये अॅझोलाचे उत्पादन घेतले जाते. अशा प्रकारचा वाफा 6 महिने ते 1 वर्ष उत्पादन देऊ शकतो

जमिनीवरील विटांचा वाफा: या प्रकारामध्ये स्वच्छ आणि समांतर जमिनीवर वरीलप्रमाणे विटाच्या थरांचा वाफा तयार केला जातो. आतून 50 मायक्राँन प्लास्टिक लावावे तसेच चारही बाजूने प्लास्टिक विटांच्या सहाय्याने झाकून घेतले जाते सदर वाफासुद्धा 6 महीने ते 1 वर्ष उत्पादन देऊ शकतो

तयार प्लास्टिक वाफा: या प्रकारामध्ये काही खासगी कंपनीचे प्लास्टिकचे तयार वाफे मिळतात जे बांबूच्या किंवा पीपी पाईपच्या साहाय्याने उभे करता येतात. हे वाफे 50 टक्के शेडनेटच्या सहाय्याने झाकून यामध्ये अॅझोला उत्पादन घेता येते साधारण 2 ते 2.5 वर्ष उत्पादन मिळते

सिमेंट बांधकामाचे पक्के वाफे: जेव्हा मोठ्या प्रमाणात अॅझोलाचे उत्पादन घ्यायचे असते तेव्हा कायम स्वरूपी पक्क्या बांधकामाचे वाफे तयार करणे फायद्याचे ठरते तसेच या वाफ्यामधील पाणी पुन्हा शेतीसाठी वापरता येते. या पद्धतीमध्ये सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी एकदाच करावा लागतो.

बकेट टब किंवा प्लास्टिकच्या भांड्यातील अॅझोला: निकामी प्लास्टिकची भांडी, टब किंवा रंगाचे डब्बे अॅझोला निर्मितीसाठी वापरता येऊ शकतात. कमी खर्चात कमी प्रमाणात अॅझोला उत्पादनासाठी ही पद्धत योग्य असून जागाही कमी लागते; मात्र उत्पादन अत्यंत कमी मिळते. कुक्कुटपालक या पद्धतीचा वापर करू शकतात.

उत्पादनात सातत्य:
अॅझोला उत्पादनामध्ये सातत्य टिकविण्यासाठी ठराविक कालावधीनंतर वाफा पुन्हा चार्ज करावा यासाठी वाफ्यातील 10 ते 15 लीटर पाणी काढून टाकावे व त्याजागी नवीन 10 ते 15 लीटर पाणी, 4 ते 5 किलो शेण, अर्धा टोपली माती आणि 20 ते 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट एकजीव करून वाफ्यात सोडावे.

सावली व्यवस्थापन:
अॅझोला ही शेवाळ वर्गातील वनस्पती असून दमट ओलसर आणि मध्यम उष्ण वातावरणात उत्तम वाढते, यादृष्टीने थेट सूर्यप्रकाश अॅझोलावर पडल्यास उत्पादनामध्ये घट दिसून येते तसेच पाने करपल्यासारखी दिसतात हे टाळण्यासाठी वाफ्यावर सतत 50 टक्के सावली राहील अशी सोय करावी यासाठी 50 टक्के शेडनेटचा वापर करावा. इतर महागड्या खाद्य निर्मितीपेक्षा स्वस्त आणि अतिशय पौष्टिक अॅझोला खाद्याचा पशुपालक शेतकर्यांनी वापर वाढवावा आणि उत्पादन खर्च कमी करावा.

लेखक- प्रीतम नलावडे
(बी. ई. मेकॅनिकल) कराड, सातारा, मो. 8408805661.टॅग्स

संबंधित बातम्या