भाजीपाला सल्ला: उशिरा वाटाणा लागवड तंत्रज्ञान
09 January 07:00

भाजीपाला सल्ला: उशिरा वाटाणा लागवड तंत्रज्ञान


भाजीपाला सल्ला: उशिरा वाटाणा लागवड तंत्रज्ञान

रब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा हे पीक आहे. नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेले पीक सद्यस्थितीत फुलोरा अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा लागणीसही सुरवात झाली आहे. ज्या भागात मार्च महिन्यातही थंड वातावरण व सरासरी तापमान १० ते २० अंश सेल्सिअस राहते तेथे सद्यस्थितीतही त्वरित लागवड केल्यास चालते. त्यानुसार नियोजन करावे.

नवीन लागवड- लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कसदार, रेतीमिश्रित (सामू- ५.५ ते ६.७) जमीन या पिकास अधिक मानवते.
लागवडीपुर्व मशागतीला या पिकात खूप महत्त्व आहे. त्यासाठी जमिनीची एकवेळा नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुशीत करून लागवड करावी.
सद्यस्थितीत लागवडीसाठी लवकर येणाऱ्या जातींची निवड करावी. उदा. असौजी, निटीओर, अर्लीबॅजर, आर्केल.

लागवडीसाठी सपाट वाफे किंवा सरी -वरंबे या पद्धतीचा अवलंब करता येतो. सपाट वाफ्यात ६० सें.मी.x ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. सरी वरंब्यावर लागवड करावयाची असल्यास ६० सें.मी. अंतरावर सऱ्या सोडाव्यात. सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने किंवा पाभरीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने लागवड केल्यास रोपांमधील अंतर ७.५ सें.मी. ठेवावे. टोकण पद्धतीने हेक्टरी २० ते २५ किलो तर पाभरीने पेरणीसाठी हेक्टरी ५० ते ७५ किलो बियाणे लागते.

वाटाणा या पिकाला प्रति हेक्टरी १५ ते २० टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. रासायनिक खतमात्रा देताना प्रति हेक्टरी २० ते ३० किलो नत्र, ५० ते ६० किलोे स्फुरद आणि ३० ते ४० किलो पालाश द्यावे. पेरणी करताना संपूर्ण स्फुरद व पालाश तसेच निम्मे नत्र द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावी.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या