डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे
24 November 07:00

डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे


डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे

पानांवरील रोगाची लक्षणे रोगाची प्रथम सुरवात ही पानांवर होते. त्यानंतर अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यांवर रोग येतो. सुरवातीला रोगग्रस्त पानांवर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पाणथळ - तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येऊन ते ३ ते ४ मि.मी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते. यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणेसुद्धा पानांप्रमाणे असतात.

फांदीवरील रोगाची लक्षणे: पानांप्रमाणे कोवळ्या फुटींवर रोगाचे ठिपके साधारणतः फांदीच्या पेऱ्यावर, फुटीच्या बेचक्यात दिसून येतात. ठिपक्यांचे लंब गोलाकार चिट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळेस ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते.

डाळिंब फळावर रोगाची लक्षणे: फळांवर पानांप्रमाणे पाणथळ - तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर-तेलकट होतो. फळांवर रोगग्रस्त भागात आडवे - उभे तडे जातात व फळे फुटतात. फळांवर थोडा जरी रोग आला, तरी त्यांची प्रत पूर्णपणे खराब होते आणि अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.

-श्री. राजु गाडेकर, संपर्क- ७७०९४९०७७७ (एम एस सी फळशास्त्र).टॅग्स

संबंधित बातम्या